ठाणेकरांसाठी ‘आंबा महोत्सवाचे आयोजन

 


कोकणातील शेतकऱ्यांना थेट दिलासा

ठाणे : आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाण्यातील गावदेवी मैदान येथे १ ते १० मे दरम्यान १९वा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दर्जेदार हापूस, पायरी, रत्ना, केसर या आंब्यांची थेट विक्री ठाणेकरांसाठी या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


या उपक्रमामुळे ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी थेट साखळी निर्माण होणार असून ग्राहकांना अस्सल आंबे वाजवी दरात मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे. महोत्सवात आंब्याबरोबरच आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड, पोहे अशा विविध कोकणी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे. सुमारे ४५ स्टॉल्समधून कोकणाचा खास सुगंध अनुभवायला मिळणार आहे.


गेल्या काही वर्षांपासून हवामान बदल, अवेळी पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे कोकण (Konkan) परिसरातील आंबा उत्पादनात मोठी घट झाली आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीत उत्पादन आणि उत्पन्न कमी झाले असून, यंदा अनेक भागांत केवळ १५ टक्के पीक हाती आल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर ठाणेकरांनी महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ग्राहकांचा सहभाग हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.



Post a Comment

Previous Post Next Post