ठाणे जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक तारांगण शहापुरात



शहापूर : ठाणे जिल्ह्यात विज्ञान आणि खगोलशास्त्राच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, शहापूर येथे जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक तारांगण (प्लॅनेटोरियम) आणि खगोल वेधशाळा उभारण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांसह विज्ञानप्रेमींना अंतराळ अभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या बंधूंनी साकारला आहे. सुमारे साडेतीन एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण तसेच आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते होणार आहे.


अत्याधुनिक सुविधा

शहापूर तालुक्यातील साकडभाव परिसरात, पोकलेवाडी जवळ जुनोनी-कोथरा मार्गावर उभारलेल्या या तारांगणात खालील सुविधा उपलब्ध आहेत.

  • ५६ आसनक्षमतेचे आधुनिक तारांगण
  • मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील ३० ते ६० मिनिटांचे खगोलशास्त्रीय शो
  • १६, १४, १० आणि ६ इंच व्यासाच्या चार शक्तिशाली दुर्बिणी
  • सोलर फिल्टरद्वारे दिवसा सूर्य निरीक्षणाची सुविधा
  • संगणकाशी जोडलेल्या दुर्बिणीद्वारे छायाचित्रण व प्रोजेक्शन
  • स्वयंचलित छप्पर असलेली वेधशाळा (एक बटणावर उघडणारी)


खगोलप्रेमींसाठी अनोखा अनुभव

या वेधशाळेतून गुरू ग्रहाचे उपग्रह, त्यावरील पट्टे, शनी ग्रहाची वलये तसेच विविध दीर्घिका स्पष्टपणे पाहता येतात. इच्छुकांना रात्रभर आकाश निरीक्षणाचा थरारक अनुभव घेण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


पर्यटकांसाठी विशेष सोयी

या प्रकल्पात केवळ खगोल अभ्यासच नव्हे तर पर्यटनालाही प्रोत्साहन देण्यात आले आहे.

  • राहण्याची स्वतंत्र व्यवस्था व डॉर्मिटरी
  • प्रदर्शन हॉल व सेल्फी पॉइंट्स
  • मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक
  • भोजन व कॅन्टीन सुविधा

तारांगणाला भेट देण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी ७५०६२६६२६६ किंवा ७५०६३२२३२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.




Post a Comment

Previous Post Next Post