अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करावी


नागरी हक्क समितीचे प्रशासनाला पत्र

दिवा \ आरती परब :  दिवा परिसरामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामां विरोधात दिवा शिळ नागरी हक्क समितीने ठोस भूमिका घेतली असून यासंदर्भात सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांना अधिकृत पत्र देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


या वेळी ॲड. रोहिदास मुंडे, माजी नगरसेवक हिरा पाटील, उबाठा शहर प्रमुख सचिन पाटील तसेच मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विषय मांडला व प्रशासनाचे लक्ष वेधले.


समितीच्या निदर्शनास आले आहे की, दिवा भागात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बांधकामे सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा बेकायदेशीर बांधकामांमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


समितीने आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा संगनमतामुळे ही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच ही अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवून पाडण्यात यावीत.


दिवा शिळ नागरी हक्क समिती प्रशासनाला आवाहन करते की, नागरिकांच्या हितासाठी त्वरित व निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे दिवा शिळ नागरी हक्क समितीने म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post