बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू, प्रणॉय प्री-क्वार्टरमध्ये

 


निंगबो (चीन) : चीनमधील निंगबो ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या युवा शटलर आयुष शेट्टी याने शानदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या ली शी फेंग याचा सरळ गेममध्ये पराभव करून प्री-क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली.

यूएस ओपन २०२५ विजेता आयुष शेट्टीने ५१ मिनिटांत २१-१३, २१-१६ अशा फरकाने विजय मिळवत स्पर्धेतील मोठी उलथापालथ घडवली. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला पिछाडीवर पडूनही आयुषने दमदार पुनरागमन करत २१-१३ ने गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही त्याने १३-१३ नंतर सलग सहा गुण घेत सामना खिशात घातला. पुढील फेरीत त्याची लढत ची यू जेन (चायनीज तैपेई) विरुद्ध होणार आहे.

महिला एकेरीत भारताच्या माजी विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधू हिने मलेशियाच्या वोंग लिंग चिंग हिच्यावर १५-२१, २१-११, २१-१९ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून आगेकूच केली. आता प्री-क्वार्टरफायनलमध्ये तिच्यासमोर चीनची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील वांग झी यी हिचे आव्हान असणार आहे.

पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय याने व्हिएतनामच्या न्गुएन हाई डँग याचा २४-२२, २१-१२ असा पराभव करत पुढील फेरी गाठली. प्री-क्वार्टरमध्ये त्याची गाठ चीनच्या होंग यांग याच्याशी पडणार आहे.

दरम्यान, भारताचे लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, मालविका बन्सोड आणि तन्वी शर्मा यांचे स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.





Post a Comment

Previous Post Next Post