मतदार यादीतून नावे वगळल्याप्रकरणी कोर्टात जाणार



ममता बॅनर्जींचा भाजप व निवडणूक आयोगावर हल्लाबोल

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या निर्णयाविरोधात आपला पक्ष पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची घोषणा त्यांनी बुधवारी केली.

राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे ९१ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. केवळ नावे वगळून तुम्ही तृणमूल काँग्रेसचा पराभव करू शकणार नाही,” असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ मधील ७.६६ कोटी मतदारसंख्येपैकी तब्बल ९०.८३ लाख नावे वगळण्यात आली आहेत.हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथील प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर मतदार यादीत फेरफार करण्याचा तसेच मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचा आरोप केला. निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असून फोनवरून नागरिकांना धमकावले जात असल्याचाही दावा त्यांनी केला.

बालागड येथील सभेत त्यांनी दावा केला की, भाजप सत्तेत आल्यास बंगालच्या सांस्कृतिक जीवनशैलीवर परिणाम होईल. तसेच श्रीरामपूर येथील सभेत भाजप ‘मतदारसंघ पुनर्रचना’च्या नावाखाली बंगालची फाळणी करण्याचा कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post