सिडकोचा १६,२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर

 

पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माणावर भर

नवी मुंबई : सिडको महामंडळाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १६,२५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करत नवी मुंबई आणि परिसरातील नियोजित शहरी विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि गृहनिर्माण क्षेत्रावर विशेष भर दिला आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सिडकोने ९,७७४.२३ कोटी रुपयांचे सुधारित उत्पन्न आणि ९,७७०.२६ कोटी रुपयांचा खर्च नोंदवत ३.९७ कोटी रुपयांचा अधिशेष साध्य केला. मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करतानाही आर्थिक शिस्त राखण्यात यश मिळाल्याचे यावरून दिसून येते. सन २०२६-२७ मध्ये १६,२५० कोटी रुपयांचे उत्पन्न, १६,१५० कोटी रुपयांचा खर्च आणि १०० कोटी रुपयांचा अधिशेष अपेक्षित असल्याचे सिडकोने स्पष्ट केले.

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, “हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, दळणवळण आणि दर्जेदार गृहनिर्माणाच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरोसिटी, प्रस्तावित एड्युसिटी, मेडिसिटी, मेट्रो लाईन ८ आणि २, तसेच आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कमुळे नवी मुंबई प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.”


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला गती

गतवर्षातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यान्वयन. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या विमानतळावर २५ डिसेंबर २०२५ पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. सध्या दररोज ७६ शहरांशी जोडणी असलेली सुमारे १५० विमान वाहतूक चळवळ होत असून १९ हजार प्रवाशांची दररोज वाहतूक होत आहे. एप्रिल २०२६ अखेरीस आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.


कनेक्टिव्हिटीसाठी मोठे प्रकल्प

सिडकोकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान ३४.८९ किमी लांबीची मेट्रो लाईन ८ विकसित केली जात आहे. तसेच नवी मुंबई मेट्रो लाईन १ए आणि लाईन २ विमानतळाशी जोडण्यासाठी विस्तार योजना तयार करण्यात आली आहे. ठाणे–एनएमआयए एलिव्हेटेड कॉरिडॉर अंतर्गत २५.३ किमी लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार असून यामुळे ठाणे ते विमानतळ प्रवासाचा कालावधी ९० मिनिटांवरून ३० मिनिटांवर येणार आहे.

थीम आधारित नवे विकास प्रकल्

नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडकोकडून विशेष आर्थिक जिल्हे विकसित करण्याचे नियोजन असून त्यामध्ये एरोसिटी : २७० हेक्टर क्षेत्रात व्यावसायिक व आतिथ्य सुविधा

एड्युसिटी : जागतिक दर्जाच्या विद्यापीठांसाठी १०० हेक्टर परिसर

मेडिसिटी : आधुनिक आरोग्य सुविधा व संशोधन केंद्रे

आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क : खारघरमध्ये १५५ हेक्टरवर आयटी व व्यावसायिक केंद्र

इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क : जेएनपीए–एनएमआयए दरम्यान ५६० हेक्टरवर



१९,३०० नव्या घरांची योजना

परवडणाऱ्या गृहनिर्माणाला प्राधान्य देत सिडकोने २०२५-२६ मध्ये १६,८७६ सदनिकांची योजना जाहीर केली होती. या योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता २०२६-२७ मध्ये १९,३०० नव्या सदनिकांची गृहनिर्माण योजना राबविण्याचे नियोजन आहे. सिडकोने स्पष्ट केले की, शाश्वत शहरी नियोजन, एकात्मिक पायाभूत सुविधा आणि नागरिक-केंद्रित विकासाच्या धोरणातून नवी मुंबईला देशातील सर्वात प्रगत व नियोजित शहरांपैकी एक बनविण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post