ठाणे : ठाणे ते मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना बुधवारी मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कोपरी उड्डाणपुलावर सुरू असलेल्या साकेत एलिव्हेटेड रोड प्रकल्पाच्या कामादरम्यान एक हायड्रॉलिक क्रेन अचानक कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, साकेत एलिव्हेटेड रोडच्या बांधकामासाठी वापरात असलेली ही अवजड क्रेन काम सुरू असताना असंतुलित होऊन कोसळली. क्रेन रस्त्यावर आडवी पडल्याने मुंबईमार्गिकेवरील अनेक लेन बंद पडल्या आणि काही क्षण परिसरात घबराट पसरली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र, क्रेन हटविण्याचे काम सुरू असल्याने कोपरी उड्डाणपुलासह ठाणे शहरात अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक प्रवाशांना ६० ते ९० मिनिटांहून अधिक विलंब सहन करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच ठाणे वाहतूक पोलिस आणि संबंधित महापालिका विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेन हटविण्यासाठी अतिरिक्त अवजड यंत्रसामग्री मागविण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वाहतूक विभागाने नागरिकांना कोपरी उड्डाणपूल टाळण्याचे आवाहन केले असून पर्यायी मार्ग म्हणून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, क्रेन कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून साकेत एलिव्हेटेड रोड प्रकल्पस्थळी पाळण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
