मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने बुधवारी मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करत घाटकोपर-मांकुर्द लिंक रोडलगत सरकारी जागेवरील सुमारे १,४०० अनधिकृत झोपड्या हटवल्या. पोलिस बंदोबस्तात पार पडलेल्या या मोहिमेत तब्बल २२ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी (अतिक्रमण निर्मूलन), मुंबई उपनगर यांनी मांकुर्द येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) मालकीच्या सरकारी जागेवरील अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने ही संयुक्त मोहीम राबवली. ही कारवाई सार्वजनिक जमीन अतिक्रमणमुक्त करून तिचा मूळ उद्देशासाठी वापर करण्याच्या व्यापक उपक्रमाचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपायुक्त (झोन-५) देविदास क्षीरसागर आणि सहाय्यक आयुक्त (एम-पूर्व) उज्ज्वल इंगोले यांच्या नेतृत्वाखाली, इमारत व कारखाना विभागातील अभियंत्यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली.
कारवाईसाठी जवळपास २०० कामगार, तीन पोकलेन मशीन, सात जेसीबी, दहा डंपर आणि हवाई पाहणीसाठी दोन ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा बेकायदेशीर बांधकाम होऊ नये, यासाठी संरक्षक भिंती आणि अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत भूमाफियांकडून मुंबईतील सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली असून काही अनधिकृत रहिवाशांना राजकीय संरक्षणही मिळत असल्याचे दिसून आले आहे. अशा भागांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने प्रशासन कठोर कारवाई करत आहे.
तसेच, अतिक्रमणमुक्त झालेल्या या जागेवर भविष्यात अत्याधुनिक ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार असून, तो सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. हा प्रकल्प विविध धर्मादाय संस्थांच्या सहकार्याने विकसित केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
