मिरा-भाईंदरमध्ये ३८ इमारती अतिधोकादायक

 


पालिकेचा तोडक कारवाईचा इशारा

 
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करत तब्बल ३८ इमारती ‘अति धोकादायक’ असल्याचे घोषित केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत.
महापालिकेच्या प्रभाग समित्यांमार्फत जुन्या, जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर संबंधित इमारतधारकांना पालिकेच्या मान्यताप्राप्त बांधकाम अभियंत्यांकडून संरचनात्मक (स्ट्रक्चरल) ऑडिट करून अहवाल सादर करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. अभियंत्यांकडून प्राप्त अहवालांच्या आधारे धोकादायक इमारतींची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण विभागाकडून शहरातील जीर्ण इमारतींची पाहणी करण्यात आली. संभाव्य अपघात टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येते. राहण्यायोग्य नसलेल्या इमारतींना ‘सी-१’ श्रेणीत समाविष्ट करून त्या पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
यंदा ‘अति धोकादायक’ घोषित करण्यात आलेल्या इमारतींवर थेट तोडक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच अनेक जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांनी वारंवार सूचना देऊनही संरचनात्मक अहवाल सादर केलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना घडू नये यासाठी ३० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास अशा इमारतींना थेट धोकादायक यादीत समाविष्ट करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त स्वप्नील सावंत व अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी दिला.


शहरातील इमारतींच्या वर्गवारीनुसार ३८ इमारती ‘सी-१’ अर्थात अतिधोकादायक आहेत. ३६ इमारती ‘सी-२’ श्रेणीत असून त्या खाली करून दुरुस्ती करणे आवश्यक आहे, तर ३४४ इमारती ‘सी-२बी’ श्रेणीत असून त्या रिकाम्या न करता दुरुस्त केल्या जाणार आहेत. तसेच ३६ इमारती ‘सी-३’ श्रेणीत असून त्यांना किरकोळ दुरुस्तीची गरज आहे.
पालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.


Post a Comment

Previous Post Next Post