अतिक्रमणाविरोधात महापौर थेट ॲक्शन मोडवर

 


अजिंठा चौक ते कुसुंबा मार्गावरील अतिक्रमणे हटविणार

जळगाव : शहरातील विकासकामे, रस्ते आणि वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थेला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात जळगाव महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबा दरम्यानच्या अतिक्रमणांवर पुढील ४८ ते ७२ तासांत धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापौर दिपमाला काळे यांनी दिली.

महापौरांनी आज अजिंठा चौक ते कुसुंबा तसेच अजिंठा चौक ते कालिका माता मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले. या भागातील अतिक्रमणधारकांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्या असून त्या नोटिसांची मुदत संपल्याने आता प्रत्यक्ष कारवाई केली जाणार आहे.




महापालिकेच्या माहितीनुसार, अजिंठा चौक ते कुसुंबा हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून येथे वाढलेली कच्ची-पक्की अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि इतर अडथळ्यांमुळे वाहतुकीस गंभीर अडचणी निर्माण होत आहेत.रस्त्यातील सर्व अतिक्रमणे हटविणे, रहदारीत अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांवर कारवाई, नव्याने उभे राहिलेले अतिक्रमण तात्काळ हटविणे यासारख्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

महापौर दिपमाला काळे यांनी स्पष्ट केले की, ही कारवाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून जळगाव शहर अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि विकासाभिमुख करण्यासाठी आवश्यक आहे. रस्ते, चौक आणि सार्वजनिक जागा या नागरिकांसाठी आहेत, अतिक्रमणासाठी नाहीत, अशी महापालिकेची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच संबंधित अतिक्रमणधारकांना प्रशासनाला सहकार्य करून स्वतःहून अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन करण्यात आले असून अन्यथा महापालिकेची कारवाई अटळ राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post