ठाण्याच्या सॅटीस पुलावर शिवशाही बसला आग


ठाणे : ठाण्यातील सॅटीस पुलावर गुरुवारी (२४ एप्रिल) दुपारी शिवशाही बसला अचानक आग लागल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील सर्व १४ प्रवासी सुखरूप बचावले.

स्वारगेट ते वसई या मार्गावर धावणारी ही बस दुपारी सुमारे १ वाजता ठाणे स्थानकात पोहोचली होती. त्यानंतर सुमारे १.३० वाजता ती वसईकडे रवाना झाली. सॅटीस पुलाच्या चढणीवर येताच बसमधून धूर निघू लागल्याचे चालक किसन गवळी यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि वाहक मिलिंद सोनावणे यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. काही क्षणांतच बसने पेट घेतल्याने परिस्थिती गंभीर झाली होती.

घटनेच्या वेळी बसमध्ये एकूण १४ प्रवासी होते. त्यापैकी १० प्रवासी स्वारगेटहून वसईकडे प्रवास करत होते, तर ४ प्रवासी ठाण्यातून बसमध्ये चढले होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग वेगाने पसरत बस काही क्षणांतच धुराच्या लोटांनी वेढली गेली. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आणि सॅटीस पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

दरम्यान, बसच्या वातानुकूलन (एसी) यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेचा परिणाम ठाणे महानगर परिवहन (टीएमटी) सेवेलाही बसला. सॅटीस पुल हा शहरातील महत्त्वाचा दुवा असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. अरुंद मार्गामुळे एकावेळी एकच बस जाऊ शकत असल्याने टीएमटी बसची लांबच लांब रांग लागली आणि प्रवाशांना विलंब सहन करावा लागला.

या आगीत काही प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे. बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून पंचनाम्यानंतरच प्रत्यक्ष कारण स्पष्ट होणार आहे.

“चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती सागर पळसुले, विभाग नियंत्रक, एसटी ठाणे विभाग यांनी दिली. 

Post a Comment

Previous Post Next Post