टी-२० विश्वचषकातील दमदार कामगिरीची दखल
दुबई : भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज संजू सॅमसन याने ICC पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील शानदार कामगिरीच्या जोरावर मार्च महिन्याचा ‘ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार पटकावला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना सॅमसनने व्यक्त केली.
या सन्मानाबद्दल बोलताना सॅमसन म्हणाला की, ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. माझ्या क्रिकेट प्रवासातील हा सर्वात संस्मरणीय काळ आहे. भारताच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर त्या क्षणाचे महत्त्व समजून घ्यायला काही वेळ लागला. त्याने पुढे सांगितले की, सध्याचा काळ भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत उत्साहवर्धक असून संघात प्रचंड प्रतिभा आहे. सहकाऱ्यांचा आणि प्रशिक्षकांचा विश्वास व पाठिंबा यामुळेच सर्वोत्तम कामगिरी करता आली.
या पुरस्कारासह गेल्या पाच महिन्यांत वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंनी हा किताब पटकावण्याची मालिका कायम राहिली आहे. यामध्ये सायमन हार्मर (दक्षिण आफ्रिका), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), डॅरिल मिचेल (न्यूझीलंड) आणि साहिबझादा फरहान (पाकिस्तान) यांचा समावेश आहे. टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीला अंतिम संघात नियमित स्थान नसतानाही, सुपर-८ फेरीतील महत्त्वाच्या सामन्यांसाठी सॅमसनला संधी देण्यात आली. झिम्बाब्वेविरुद्ध २४ धावांनी सुरुवात केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
१ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध ९७* धावांची खेळी करत त्याने शतक थोडक्यात हुकवले, मात्र या खेळीमुळे भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता आला. त्यानंतर मुंबईतील वानखेडे मैदानावर इंग्लंडविरुद्ध ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला २५३/७ अशी भक्कम धावसंख्या उभारता आली आणि सामना सात धावांनी जिंकला. अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यातही सॅमसनने ८९ धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला.
मार्च २०२६ मध्ये खेळलेल्या तीन महत्त्वाच्या टी-२० सामन्यांत सॅमसनने तब्बल २७५ धावा करत १३७.५० ची सरासरी आणि १९९.२७ चा स्ट्राइक रेट नोंदवला. या कामगिरीमुळे त्याला सलग ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाले तसेच ICC टी-२० फलंदाजी क्रमवारीत टॉप-२० मध्ये स्थान मिळाले. ICC कडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा सन्मान सॅमसनला प्रथमच मिळाला असून, त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
