मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोकणातील जनतेच्या दीर्घकालीन मागणीला अखेर प्रतिसाद देत सिंधुदुर्गातील सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” असे करण्यास मंजुरी दिली आहे. या नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या उभारणीत मधु दंडवते यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याने स्थानिकांकडून ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.
याशिवाय, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ सालातील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यासाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५’ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योग विभागाच्या प्रस्तावानुसार, डोंबिवली येथील सोनारपाडा परिसरातील पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मौजे सागाव, सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील सुमारे ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यास तसेच मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास मान्यता देण्यात आली.
तसेच, नागपूर येथील नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. मौजे गोदणी आणि लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा) येथील खाजगी जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्यात येणार असून, या व्यवहारावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.
