पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत पश्चिम रेल्वे सकारात्मक
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडेय यांची भेट घेऊन जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांकडे तातडीने लक्ष वेधले. या बैठकीत कैलाश वर्मा आणि संकेत ठाकूर उपस्थित होते. यावेळी पहाटे ४ वाजेदरम्यान डहाणूहून चर्चगेटसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक सहमती दर्शविण्यात आली.
बैठकीत पालघर रेल्वे स्थानकावर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली. पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून शहर व्यावसायिक व शैक्षणिक केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असल्याने नियमित तसेच नव्याने सुरू होणाऱ्या विशेष गाड्यांना येथे थांबा देण्याची आवश्यकता खासदार सवरा यांनी मांडली.
यामध्ये हिसार-खडकी (22979/22980), तिरुचिरापल्ली-अहमदाबाद, वांद्रे-अजमेर (19625/19626), अहमदाबाद-मंगळूर, मुंबई-काठगोदाम (21907/21908) आणि वांद्रे-जबलपूर (20163/20164) या गाड्यांचा समावेश आहे. तसेच वांद्रे-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस (12935/12936) आणि वांद्रे-गाझीपूर एक्स्प्रेस (20941/20942) या गाड्यांच्या थांब्याबाबत व्यवहार्यता तपासणी पूर्ण झाल्याने त्याला तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय वांद्रे-भावनगर (12971/12972), दौंड-इंदूर (22943/22944), दादर-अजमेर (12989/12990) आणि सूर्यनगरी एक्स्प्रेस (12479/12480) यांनाही पालघर स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणीही करण्यात आली. विरार-डहाणू मेमू (69173/69174) सेवेचा विस्तार उमरगाम रोडपर्यंत करावा, तसेच वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन 93002, 93004 आणि 93033 या उपनगरीय गाड्यांचे १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली.
डहाणू रोड स्थानकावरील फलाट क्रमांक ४ आणि ५ ची लांबी वाढवून ती १५ डब्यांच्या गाड्यांसाठी योग्य करण्यात यावी, तसेच नोकरदारांसाठी पहाटे ४ वाजता डहाणूहून चर्चगेटसाठी आणि दुपारी २ वाजता चर्चगेटहून डहाणू रोडसाठी नवीन उपनगरीय सेवा सुरू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
औद्योगिक वाढ लक्षात घेता डहाणू रोड आणि बोईसर स्थानकांवर अतिरिक्त एक्स्प्रेस थांबे देण्याची मागणी करण्यात आली. डहाणू रोड येथे पुणे-भुज एक्स्प्रेस (11901/11902) आणि खान्देश एक्स्प्रेस (19003/19004), तर बोईसर येथे कोईम्बतूर-राजकोट एक्स्प्रेस (16613/16614) आणि वांद्रे-रामनगर एक्स्प्रेस (22975/22976) यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच पालघर तालुक्यातील कोलगाव येथील जेनेसिस इंडस्ट्रियल टाऊनशिपजवळील रेल्वे गेट क्रमांक ४८ कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने दररोज हजारो कामगार आणि नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे खासदार सवरा यांनी निदर्शनास आणून दिले. सध्याचा उड्डाणपूल दोन किलोमीटर अंतरावर असल्याने त्याचा स्थानिकांना उपयोग होत नसल्याचे सांगत, बंद रेल्वे गेट क्रमांक ४८ जवळ तातडीने पादचारी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.
