बेल्जियममध्ये शाळेच्या बसला ट्रेनची धडक

 दोन मुलांसह चौघांचा मृत्यू 


ब्रुसेल्स :  बेल्जियममधील फ्लँडर्स प्रदेशात मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात शाळेच्या मिनीबसला वेगवान रेल्वेगाडीची धडक बसून दोन लहान मुलांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेल्जियमचे उपपंतप्रधान मॅक्सिम प्रेवो यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, बुग्गेनहाउट परिसरात हा अपघात घडला. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे,” असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान बार्ट डे वेव्हर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, “हा भयानक अपघात मन हेलावून टाकणारा आहे. पीडित कुटुंबीयांबद्दल माझ्या संवेदना आहेत,” असे म्हटले. अपघाताच्या वेळी मिनीबसमध्ये सात मुले, एक पर्यवेक्षक आणि चालक असे एकूण नऊ जण प्रवास करत होते. सुदैवाने रेल्वेगाडीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बेल्जियमच्या इन्फ्राबेल या रेल्वे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाडी सुमारे १२० किमी प्रतितास वेगाने धावत होती. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की मिनीबस सुमारे १५ मीटर दूर फेकली गेली.

प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी रेल्वे क्रॉसिंगवरील बॅरिअर्स बंद होते आणि लाल सिग्नल सुरू होता. तरीही हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मिनीबसमधील मुले ही विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेतील होती.

दरम्यान, बेल्जियमचे गृहमंत्री बर्नार्ड क्विंटिन यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पीडितांच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यांनी “आज संपूर्ण युरोप बेल्जियमसोबत दुःख व्यक्त करत आहे,” असे म्हणत संवेदना व्यक्त केल्या. अपघातानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post