या घटनेत अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सुजित पष्टे (४५), तांडेल समीर जाधव (४०) आणि प्रशिक्षणार्थी जवान हर्ष धुमाळ (१९) हे जखमी झाले असून त्यापैकी दोघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे सुमारे १.२८ वाजता नगरसेवक संजय वाघुळे यांनी फोनद्वारे गावदेवी भाजी मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती दिली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, ३ जम्बो वॉटर टँकर, २ वॉटर टँकर, ४ रेस्क्यू वाहने, आपत्ती व्यवस्थापन पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एस. वाय. तडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते. ते आणि अग्निशमन दलामध्ये मोबाईलद्वारे सतत संपर्क सुरू होता. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन जवान सागर शिंदे आत गेले. दोघांनाही बाहेर काढण्यात यश आले, मात्र धुरामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्यांचे व्यवसाय अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी २५ ते ३० विक्रेते येथे झोपत असल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे, या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय आहे. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.


