अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
पालघर : डॉ. हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली मनोर–वाडा तसेच वाडा–भिवंडी महामार्गाचा पाहणी दौरा पार पडला. दौऱ्याची सुरुवात कंचाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन झाली. बैठकीला पीडब्ल्यूडी तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर खासदारांनी थेट अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांमुळे वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी, वाढती अपघातांची संख्या आणि अपूर्ण कामांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करत तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना दिल्या.
यानंतर खासदारांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. पाली येथील पुलाचीही त्यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
पावसाळा जवळ येत असल्याने रस्त्यांची पूर्वतयारी करण्यावर विशेष भर देण्यात आला. मनोर ते वाडा हा २३ किमीचा रस्ता असून त्यापैकी सुमारे १२ ते १३ किमीपर्यंत एक लेन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महामार्गावरील खड्डे तातडीने भरणे, अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्त करणे आणि दर्जेदार काम करण्याचे आदेश देण्यात आले.
याशिवाय पावसाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन, जेसीबी यंत्रणा, खडीची उपलब्धता आणि इतर आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
“मे अखेरपर्यंत सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्ण होईल. नागरिकांनीही वाहन चालवताना, विशेषतः ब्लॅक स्पॉट भागात, काळजी घ्यावी,” असे आवाहन खासदार डॉ. सवरा यांनी केले. या पाहणी दौऱ्यावेळी खासदारांसमवेत कार्यकर्ते, पीडब्ल्यूडी अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
