मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नीजेनेलिया देशमुख ही जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात या दोघांना प्रेमाने ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखले जाते. विविध कार्यक्रमांमधील त्यांची केमिस्ट्री आणि मजेशीर व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने मोठे यश मिळवत मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केल्याची चर्चा आहे. मात्र याच दरम्यान काही वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील असून त्यामध्ये प्रीती झिंटा आणि रितेश देशमुख एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात. यावेळी रितेशने प्रीतीच्या हातावर किस केल्याचेही व्हिडीओत पाहायला मिळते. त्याचवेळी शेजारी उभी असलेली जिनिलिया काहीशी नाराज किंवा वैतागलेली दिसत असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केले होते. त्या वेळी जिनिलियाने स्वतः या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत, ती थकलेली असल्यामुळे तिचा चेहरा तसा दिसत असल्याचे स्पष्ट केले होते. आता अनेक वर्षांनंतर खुद्द रितेश देशमुखनेही या व्हिडीओमागील खरी गोष्ट सांगितली आहे.
एका मुलाखतीदरम्यान रितेशला हा व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यावर त्याने मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया देताना “काढ रे तो व्हिडीओ” असे म्हणत वातावरण हलकेफुलके केले. यानंतर रितेशने सांगितले की, “मी आणि जिनिलिया एका कार्यक्रमाला गेलो होतो. बराच वेळ उंच टाचेच्या चपला घातल्यामुळे तिचे पाय खूप दुखत होते. ती खूप थकली होती आणि तिला लवकर घरी जायचे होते. पण त्याचवेळी प्रीती झिंटा तिथे आली.”
तो पुढे म्हणाला, “प्रीती नुकतीच अमेरिकेतून आली होती. अनेक दिवसांनी आमची भेट झाली होती, त्यामुळे आम्ही गप्पांमध्ये रमलो. जिनिलिया आधीच थकलेली आणि वैतागलेली होती. त्याच क्षणी छायाचित्रकारांनी तो व्हिडीओ टिपला आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.”

