नाल्याच्या संरक्षक भिंतीला भगदाड पाडून पाणी रस्त्यावर सोडण्याचा घाट?

 

एमआयडीसीचा अजब कारभार

डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भाग असलेल्या मिलापनगरमध्ये एमआयडीसीच्या एका निर्णयामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिसरातील एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या बंगल्याजवळील मुख्य नाल्याच्या संरक्षक भिंतीला तीन ठिकाणी भगदाड पाडून त्यामध्ये दोन फूट व्यासाचे सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


मिलापनगर परिसरातून वाहणाऱ्या या मोठ्या नाल्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. दरवर्षी नाल्यातील पाण्याची पातळी संरक्षक भिंतीपर्यंत पोहोचत असली तरी या भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह रस्त्यावर किंवा निवासी भागात शिरत नाही. मात्र आता पावसाळा तोंडावर असताना या भिंतीला तीन ठिकाणी भगदाड पाडण्यात आले असून त्यामध्ये दोन फूट व्यासाचे सिमेंट पाईप बसविण्याची तयारी सुरू आहे.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या पाईपपैकी दोन पाईपची तोंडे थेट रस्त्याकडे तर एक तोंड निवासी बंगल्यांच्या दिशेने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नाल्यातील अतिरिक्त पाणी थेट रस्त्यावर आणि वस्तीमध्ये सोडले जाईल. आधीच पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या या भागात यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


या निर्णयामागे नेमका काय हेतू आहे, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. “पावसाचे पाणी रोखण्यासाठी असलेल्या संरक्षक भिंतीतच भगदाड पाडण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली?” अशी चर्चा परिसरात रंगली आहे.


या संदर्भात मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचे सचिव अरुण जोशी व इतर जागरूक नागरिकांनी एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्यांना घटनास्थळी बोलावून संभाव्य धोक्याची माहिती दिली. पावसाळ्यात या कामामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत नागरिकांनी सविस्तर मांडणी केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनाही नागरिकांची भूमिका पटल्याचे सांगितले जाते. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.


दरम्यान, हे काम नेमके कोणाच्या सूचनेवरून करण्यात आले, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही योजना खरोखरच तांत्रिक गरज म्हणून राबविण्यात आली की केवळ ठेकेदाराला काम मिळावे म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला, अशी शंका स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच या कामावर झालेला खर्च अखेरीस कोणाच्या माथी मारला जाणार, याचाही खुलासा एमआयडीसीने करावा, अशी मागणी होत आहे.


स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात हस्तक्षेप करून एमआयडीसीकडून स्पष्टीकरण मागावे आणि संभाव्य पूरधोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मिलापनगरमधील रहिवाशांनी केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post