गोव्यात दाखल; पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा
पुणे : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्राच्या वेशीवर धडक दिली असून शुक्रवारी (५ जून) त्याचे गोव्यात अधिकृत आगमन झाले. केरळमध्ये ४ जून रोजी दाखल झाल्यानंतर मान्सूनने वेगाने पुढील वाटचाल करत संपूर्ण दक्षिण गोवा व्यापला आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून पुढील दोन ते तीन दिवसांत तो संपूर्ण गोवा व्यापत महाराष्ट्रात प्रवेश करेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनने गोव्यासह कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांतही प्रगती केली आहे. सध्या मान्सूनची सीमा गोव्यातील पणजी, कर्नाटकातील बंगळुरू तसेच तामिळनाडूतील सालेम आणि पामबनपर्यंत पोहोचली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून पुढील ४८ ते ७२ तासांत महाराष्ट्रात त्याचे अधिकृत आगमन होण्याची शक्यता आहे.
मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागांत आधीच हजेरी लावली असून पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशीव आणि लातूर जिल्ह्यांसह विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
यंदाच्या पावसाळ्याबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा अंदाज 'सामान्यपेक्षा कमी पाऊस' या श्रेणीत मोडत असून अंदाजामध्ये सुमारे ४ टक्क्यांची त्रुटी संभवते, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
मान्सूनच्या वेगवान प्रगतीमुळे शेतकरी, जलसाठे आणि पाणीपुरवठा व्यवस्थेकडे लक्ष लागले असून महाराष्ट्रातील नागरिकांना आता मान्सूनच्या अधिकृत आगमनाची प्रतीक्षा आहे.
