टाटा मोटर्सची इलेक्ट्रिकसह हायड्रोजन तंत्रज्ञानातील गुंतवणूक कायम


व्यावसायिक वाहनांच्या स्वच्छतेसह स्मार्ट भविष्यासाठी कंपनीचा निर्धार


नवी दिल्ली : व्यावसायिक वाहन क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी टाटा मोटर्स इलेक्ट्रिक तसेच हायड्रोजन-आधारित तंत्रज्ञानातील गुंतवणूक सुरूच ठेवणार असल्याचे कंपनीचे चेअरमन यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी इलेक्ट्रिक, हायड्रोजन आणि अधिक स्वच्छ अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) तंत्रज्ञानाचा समतोल पोर्टफोलिओ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


कंपनीच्या वार्षिक अहवालात भागधारकांना संबोधित करताना चंद्रशेखरन यांनी नमूद केले की, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या प्रगतीमुळे वाहनांची रचना, ग्राहकांचा अनुभव आणि सेवा व्यवस्थापनामध्ये मोठे बदल घडून येत आहेत. तसेच स्वच्छ ऊर्जेकडे होत असलेले संक्रमण, वाढत्या सुरक्षा अपेक्षा आणि जागतिक पुरवठा साखळीतील बदल यांमुळे वाहन उद्योगातील स्पर्धेचे स्वरूपही बदलत आहे.


भूराजकीय घडामोडी आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील असमान सुधारणा यामुळे उद्योगासमोरील आव्हाने वाढली असली, तरी चपळता आणि लवचिकता या गुणांच्या बळावर कंपन्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


जड व्यावसायिक वाहनांसाठी हायड्रोजन तंत्रज्ञानाला मोठी क्षमता असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, कंपनी शून्य-उत्सर्जन करणाऱ्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचा विस्तार करत असतानाच हायड्रोजन-आधारित उपाययोजनांवरही भर देत राहणार आहे.


कंपनीचा मजबूत ताळेबंद, सुधारलेली आर्थिक कामगिरी आणि शिस्तबद्ध भांडवल व्यवस्थापन यामुळे आगामी काळातही फायदेशीर वाढ कायम ठेवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिजिटल सोल्यूशन्स, कनेक्टेड वाहन तंत्रज्ञान, प्रगत चालक सहाय्य प्रणाली (ADAS), डेटा-आधारित फ्लीट सेवा आणि नव्या पिढीतील पॉवरट्रेन तंत्रज्ञान यावर कंपनीचा विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीने ८३,८५५ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल नोंदवला असून, मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ९.८ टक्के वाढ साध्य केली आहे. तसेच ऑटोमोटिव्ह व्यवसायातून नियोजित भांडवलावर ७२.३ टक्के परतावा मिळाल्याने कंपनीची नफाक्षमता अधिक बळकट झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post