वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ गुंडाळल्यास कारवाई


 एफएसएसएआयचे कडक निर्देश

मुंबई : वडापाव, भजी, समोसे, इडली, पोहे यांसारखे खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून देण्याच्या प्रथेविरोधात अन्न सुरक्षा यंत्रणांनी कठोर भूमिका घेतली आहे. अन्नपदार्थांचा थेट संपर्क वर्तमानपत्राशी येणार नाही, यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


अन्न सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये विविध रसायने, रंगद्रव्ये आणि काही जड धातूंचा समावेश असू शकतो. गरम किंवा तेलकट पदार्थ वर्तमानपत्राच्या संपर्कात आल्यास ही घातक द्रव्ये अन्नात मिसळण्याची शक्यता असते. यामुळे दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.


याशिवाय वर्तमानपत्रांचे वितरण आणि हाताळणी विविध ठिकाणी होत असल्याने त्यावर धूळ, जंतू किंवा इतर दूषित घटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कागदाचा अन्नपदार्थांसाठी वापर केल्यास अन्नजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.


अन्न सुरक्षा आणि मानके नियमांनुसार अन्नपदार्थ साठवण्यासाठी, गुंडाळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर करण्यास मनाई आहे. रस्त्यावरील खाद्यविक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लाउड किचन्स, केटरर्स आणि इतर खाद्य व्यवसायांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.


विशेषतः अतिरिक्त तेल शोषण्यासाठी, अन्नपदार्थ झाकण्यासाठी किंवा पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याऐवजी अन्न सुरक्षेच्या निकषांनुसार मान्यताप्राप्त ‘फूड-ग्रेड’ पॅकेजिंग साहित्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच जनजागृती आणि तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित पॅकेजिंगचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post