अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान


अश्विनी केंद्रे यांचा प्रशासनाला इशारा

दिवा \आरती परब : दिवा शहरातील बोगस व अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे" असे सांगत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले होते. मात्र, अनधिकृत व बोगस शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर तसेच त्यांच्या भविष्यातील संधींवर विपरीत परिणाम होत असल्याची खंत अश्विनी केंद्रे यांनी व्यक्त केली.


गेल्या वर्षी दिवा शहरातील मॉडर्न डिस्कवरी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज वेळेत भरले गेले नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित शाळांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


याशिवाय, दिवा शहरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाने अधिक शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेला गोरखधंदा तात्काळ बंद करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबवावा, असे केंद्रे यांनी नमूद केले.


या प्रकरणी तातडीने कारवाई करून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्यात यावा, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सचिव सौ. अश्विनी अमोल केंद्रे व उपखजिनदार अनिल रामपाल मौर्य यांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post