श्रेयस अय्यरकडे टी-२० संघाच्या नेतृत्वाची धुरा?



आयर्लंड-इंग्लंड दौरा आणि आशियाई खेळांसाठी संघनिवडीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याच्याकडे टी-२० संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता असून विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव याची जागा तो घेऊ शकतो. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी शनिवारी मुंबईत राष्ट्रीय निवड समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

भारतीय संघ २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार असून त्यानंतर १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठीही याच बैठकीत संघ जाहीर होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज टिळक वर्मा याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच अवघ्या १५ वर्षांचा प्रतिभावान फलंदाज वैभव सूर्यवंशी याला प्रथमच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदावरून हटविण्यासोबतच संघाबाहेरही ठेवले जाऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून मनगटाच्या दुखापतीमुळे त्याचा फॉर्म घसरल्याचे मानले जात आहे.

श्रेयस अय्यरला नेतृत्वासाठी प्राधान्य देण्यामागे त्याची आयपीएलमधील यशस्वी कर्णधारकी महत्त्वाची ठरली आहे. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत नेणारा तो एकमेव कर्णधार असून त्याने एका संघाला विजेतेपदही मिळवून दिले आहे.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान आशियाई खेळ होत असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या स्पर्धेसाठीही मजबूत संघ पाठविण्याच्या तयारीत आहे.

आशियाई खेळांसाठीच्या संघाचे नेतृत्व टिळक वर्माकडे सोपविले जाऊ शकते. या संघात वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये २८ बळी घेऊन प्रभावी कामगिरी करणाऱ्या अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या पुनरागमनाबाबतही निवड समितीमध्ये चर्चा होणार आहे. मात्र २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार करता निवड समिती दीर्घकालीन धोरण लक्षात घेऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post