दिवा शहरातील नालेसफाई कामांबाबत मनसेची तीव्र नाराजी


दिवा \ आरती परब : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहराचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन दिवा शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० मे पूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, पावसाळा तोंडावर असताना देखील कामांचा वेग अत्यंत संथ असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अल्प पावसातही शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळेल असे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 


यावर्षी नालेसफाईसाठी सुमारे १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एवढा मोठा खर्च करूनही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने होत नसल्यास तो सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे. दिवा प्रभाग समिती मधील प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ मध्ये मोठा गाजावाजा करत नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. संबंधित नालेसफाईच्या कंत्राटदाराला सहाय्यक आयुक्तांसमोरच फोन केला असता कंत्राटदाराने २५० कामगार नालेसफाई साठी काम करत असल्याची माहिती दिली. पण काम कुठे सुरू आहे याची माहिती विचारातच कुठलेही समाधानकारक उत्तर कंत्राटदाराला देता आले नाही. ज्या स्वच्छता निरीक्षकांनी या सर्व कामावर देखरेख ठेवायला हवी त्या स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी यांनाही नालेसफाई नेमकी कुठे सुरू आहेत, तिथे किती कामगार काम करतात याची माहिती नव्हती. 


अशा पद्धतीने जर दिवा शहरात कामे होत असतील तर नालेसफाई कशा पद्धतीने होत असेल याचा विचार न केलेला बरा, असे मनसेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.  ठाणे महापालिकेने ८०% नालेसफाई झाल्याचा दावा केलेला असताना दिव्यात मात्र सगळा सावळागोंधळ दिसून येत आहे. दिव्यात सध्या २०% ते २५% नालेसफाई झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांना मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशारा दिवा मनसेने दिला आहे. यावेळी दिवा शहराध्यक्ष तुषार भास्कर पाटील, शहर सचिव प्रशांत प्रभाकर गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, शरद पाटील, संतोष पाटील, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, महिला पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post