मुलींच्या संघाला सुवर्ण, मुलांच्या संघाला रौप्य; वैयक्तिक पुरस्कारांवरही महाराष्ट्राचा ठसा
ठाणे \ आरती परब : ओडिशातील भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांनी उल्लेखनीय यश मिळवत राज्याचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक उंचावला आहे. मुलींच्या संघाने शानदार खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
२४ ते २९ मे या कालावधीत किट युनिव्हर्सिटीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत देशभरातील बलाढ्य संघांनी सहभाग घेतला होता. मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण आणि संघभावनेने केलेल्या कामगिरीमुळे अंतिम फेरीपर्यंत दमदार मजल मारत पदकांची कमाई केली.
वैयक्तिक पुरस्कारांमध्येही महाराष्ट्राची सरशी
- संघीय यशाबरोबरच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीतही आपली छाप सोडली.
- अस्मि राऊत हिने मुलींच्या गटात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत 'बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट' हा मानाचा पुरस्कार पटकावला.
- मुलांच्या गटात यश शिंदे याने प्रभावी कामगिरीच्या जोरावर 'बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार मिळवला.
- आर्या चव्हाण हिने उत्कृष्ट बचावात्मक खेळ करत 'बेस्ट कॅचर ऑफ द टूर्नामेंट' हा बहुमान मिळवला.
- या पुरस्कारांमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा दखल घेतली गेली.
अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन ठरले निर्णायक
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांच्या यशामागे प्रशिक्षकांचे नियोजन आणि मेहनत महत्त्वाची ठरली. मुलींच्या संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आरती भगत आणि रिया आगवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तर मुलांच्या संघाचे नेतृत्व राष्ट्रीय पदकविजेते सोमनाथ सपकाळ आणि धनंजय शिरसाट यांनी केले.
या अनुभवी प्रशिक्षकांनी खेळाडूंना दिलेले तांत्रिक मार्गदर्शन, सामनानिहाय रणनीती आणि मानसिक तयारी यांचा संघाच्या यशात मोठा वाटा राहिला.
संघटनेकडून अभिनंदन
महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष Jitendra Awhad आणि सचिव राजेंद्र इखणकर यांनी या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचा गौरव वाढविल्याचे सांगत, भविष्यातही अशाच प्रकारची यशस्वी वाटचाल सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राच्या या दुहेरी यशामुळे राज्यातील क्रीडावर्तुळात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
