ठाणे महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा खारेगाव येथे सुरू


आयुक्तांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

ठाणे : ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा ‘ठाणे महानगरपालिका – क्रिस्टल हाऊस शाळा’ आजपासून खारेगाव येथे सुरू झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादाने आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


यावेळी उपायुक्त (शिक्षण) डॉ. मिताली संचेती, उपनगर अभियंता विकास ढोले, तसेच संबंधित अधिकारी आणि क्रिस्टल हाऊस संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शाळेची घंटा सकाळी ९ वाजता वाजली आणि पहिल्याच दिवशी १७७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली. ठाणे महापालिका आणि क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


खारेगाव येथील सफायर रुग्णालयाजवळ उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी महापालिकेने विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा आणि कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था, लिफ्ट तसेच इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटीचा समावेश आहे.


क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाकडून प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पूर्व-प्राथमिक ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय गणवेश, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, भोजन व्यवस्था आणि शाळेपर्यंत वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणावरही विशेष भर दिला जाणार आहे.


या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी निर्माण झाली आहे. शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनीही आयुक्तांशी विविध विषयांवर संवाद साधत आपले अनुभव आणि अपेक्षा व्यक्त केल्या.



Post a Comment

Previous Post Next Post