ई-20 पेट्रोलसाठी २०१६ पूर्वीच्या काही वाहनांमध्ये किरकोळ बदलांची गरज

 


इंजिनमध्ये कोणतेही बदल आवश्यक नाहीत : नितीन गडकरी

नवी दिल्ली  : देशभरात इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या ई-20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) कार्यक्रमाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यसभेत बुधवारी लेखी उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, २०१६ पूर्वी उत्पादित काही बीएस-३ (BS-III) वाहनांमध्ये केवळ काही रबरचे भाग आणि गॅस्केट बदलण्याची आवश्यकता भासू शकते. मात्र, कार किंवा दुचाकीच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची गरज नसल्याचे विविध तज्ज्ञ संस्थांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

गडकरी यांनी सांगितले की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (IIP), डेहराडून, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांनी ई-20 पेट्रोलचा विविध प्रकारच्या वाहनांवर सखोल अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, कार आणि दुचाकींच्या इंजिनमध्ये कोणत्याही तांत्रिक बदलाशिवाय ई-20 पेट्रोलचा सुरक्षित वापर करता येतो.

या चाचण्यांमध्ये २०१६ पूर्वीची जुनी वाहनेही समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यानंतर वाहनांच्या कार्यक्षमतेत कोणताही लक्षणीय फरक, इंजिनची असामान्य झीज किंवा तांत्रिक बिघाड आढळून आला नाही. वाहन चालविण्याची क्षमता (Drivability), इंजिन सुरू होण्याची क्षमता (Startability), धातूंची सुसंगतता (Metal Compatibility) आणि प्लास्टिक सुसंगतता (Plastic Compatibility) यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्येही कोणतीही समस्या आढळली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तथापि, १ एप्रिल २००५ पासून लागू झालेल्या बीएस-३ मानकांनुसार तयार करण्यात आलेल्या आणि २०१६ पूर्वी उत्पादन झालेल्या काही वाहनांमध्ये रबरचे होज, सील किंवा गॅस्केटसारखे काही भाग बदलावे लागू शकतात. मात्र हे बदल अत्यंत किरकोळ असून, वाहनाच्या नियमित सर्व्हिसिंगदरम्यान सहज करता येतात. त्यामुळे वाहनधारकांनी याबाबत अनावश्यक चिंता करण्याचे कारण नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

ई-20 पेट्रोलमुळे वाहनाचे मायलेज कमी होते, असा अनेक वाहनधारकांचा समज आहे. यावर स्पष्टीकरण देताना गडकरी म्हणाले की, मायलेज केवळ इंधनावर अवलंबून नसून वाहनाची स्थिती, इंजिनची देखभाल, रस्त्यांची परिस्थिती, वाहन चालविण्याची पद्धत आणि वाहतूक कोंडी यांसारख्या अनेक घटकांवर ते अवलंबून असते. त्यामुळे ई-20 पेट्रोलमुळेच मायलेजमध्ये घट होते, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे वाहन उत्पादक आणि चाचणी संस्थांनी स्पष्ट केले आहे.

ते पुढे म्हणाले की, नीती आयोगाने २६ डिसेंबर २०२० रोजी स्थापन केलेल्या आंतरमंत्रालयीन समितीने इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत सखोल अभ्यास केला होता. या समितीने वाहनांची सुसंगतता, इंजिन कॅलिब्रेशन, इंधन प्रणाली, टिकाऊपणा, प्रदूषण, कार्यक्षमता आणि इंधन कार्यक्षमतेसह सर्व बाबींचा अभ्यास करून 'रोडमॅप फॉर इथेनॉल ब्लेंडिंग इन इंडिया २०२०-२५' हा अहवाल जून २०२१ मध्ये सादर केला होता. या अभ्यासाला IOC, ARAI आणि SIAM यांच्या संशोधनाचाही आधार होता.

गडकरी यांनी सांगितले की, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (EBP) कार्यक्रम वैज्ञानिक पडताळणी, टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी आणि सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत करून राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पेट्रोलवरील आयात अवलंबित्व कमी होण्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असून पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरालाही चालना मिळणार आहे.

जगातील अनेक देशांमध्ये शंभर वर्षांहून अधिक काळ इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर सुरू असून, ब्राझीलसारख्या देशांमध्ये अधिक प्रमाणातील इथेनॉल मिश्रित इंधनाचा यशस्वी वापर अनेक दशकांपासून केला जात आहे. त्यामुळे भारतातही ई-20 इंधनाचा वापर सुरक्षित, व्यवहार्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post