नवी दिल्ली : जर्मनीची आघाडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यू (BMW) ने २०२७ अखेरपर्यंत जर्मनीतील सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती (Voluntary Redundancy) योजनेद्वारे कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वाहनांच्या घटत्या मागणीमुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे होत असलेल्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीने सांगितले की, कामगार प्रतिनिधी मंडळाशी (वर्क्स कौन्सिल) झालेल्या करारानुसार ही कर्मचारी कपात प्रामुख्याने प्रशासकीय आणि संशोधन-विकास (Administration आणि Development) विभागांमध्ये केली जाणार असून, उत्पादन विभागावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, बीएमडब्ल्यूच्या जर्मनीतील मनुष्यबळात सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांची घट होण्याची शक्यता आहे. सध्या म्युनिकस्थित या कंपनीत जगभरात सुमारे १.५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
जर्मनीतील वाहन उद्योग सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे महागडे संक्रमण, चिनी वाहन उत्पादकांकडून वाढती स्पर्धा आणि अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काच्या परिणामांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करत आहे.
बीएमडब्ल्यूपूर्वी फोक्सवॅगन आणि मर्सिडीज-बेंझ यांनीही पुनर्रचना योजनेअंतर्गत हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय, फोक्सवॅगन समूहाची उपकंपनी पोर्शेने २०३५ पर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे २० टक्क्यांनी कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. तर ऑडीच्या नेक्कारसुल्म कारखान्यात हजारो कर्मचाऱ्यांनी फोक्सवॅगनच्या पुनर्रचना योजनेविरोधात आंदोलन केले असून, कंपनीच्या जर्मनीतील चार उत्पादन प्रकल्पांपैकी एक बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत जर्मनीतील इतर वाहन कंपन्यांच्या तुलनेत अधिक सक्षम मानली जाणारी बीएमडब्ल्यूने जून महिन्यात चालू आर्थिक वर्षासाठीच्या नफा अंदाजात कपात केली होती. चीनमधील अपेक्षेपेक्षा कमी विक्री आणि वाहनांच्या घटत्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलान नेदेल्जकोव्हिक यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, वाहन उद्योगात मूलभूत बदल होत असून, ते बीएमडब्ल्यूच्या व्यवसाय मॉडेललाच नव्याने आकार देत आहेत. त्यामुळे कंपनीची दीर्घकालीन नफाक्षमता वाढविण्यासाठी खर्चकपातीच्या उपाययोजना अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बीएमडब्ल्यू गुरुवारी आपल्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे.
