पालघर जिल्ह्यात सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी


  २ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा

पालघर : भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी २ जुलै रोजी अतिवृष्टीचा (Heavy to Very Heavy Rainfall) रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. इंदू राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना गुरुवार, २ जुलै रोजी सुट्टई जाहीर केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयांनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंगणवाड्या, सरकारी व खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांना २ जुलै रोजी सुट्टी राहणार आहे.

मात्र, या सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाची आवश्यक कामे पार पाडावीत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post