कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हा संघटकपदी तुषार भास्कर पाटील
दिवा \ आरती परब : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार तुषार भास्कर पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हा संघटकपदी, तर प्रशांत प्रभाकर गावडे यांची दिवा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
तुषार पाटील आणि प्रशांत गावडे हे दोघेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिवा शहरात पक्षासाठी निष्ठेने कार्यरत आहेत. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत वेळोवेळी विविध जबाबदाऱ्या सोपवल्या असून, या नव्या नियुक्तीद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
नियुक्तीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. दिवा शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत मनसेला सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभे करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मनसे नेते राजुदादा पाटील यांनी तुषार पाटील आणि प्रशांत गावडे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्ष नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच दोन्ही नव्या पदाधिकाऱ्यांवर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

