मुसळधार पावसाचा फटका शाळांना


नगरसेविका स्नेहा पाटील यांनी घेतली धाव

दिवा \ आरती परब  : काल सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील काळुबाई अपार्टमेंट जवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे लगतच असलेल्या रायझिंग शाळेच्या परिसरातही पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळा व्यवस्थापनाला नाईलाजास्तव आज सुट्टी जाहीर करावी लागली.


या घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापनाने नगरसेविका स्नेहा अमर पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर स्नेहा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून पाणी साचण्याच्या समस्येची पाहणी केली. तसेच परिसरातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


याच दरम्यान प्रभागातील सुरेश नगर भागातील चाळींमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. याची दखल घेत नगरसेविका स्नेहा पाटील यांनी त्या भागालाही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. महापालिका कर्मचाऱ्यांना त्वरित पाणी बाहेर काढण्याचे व निचऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याच्या घटना वाढत असून महापालिकेने अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post