मराठी चित्रपटसृष्टीत सध्या रहस्य, थरार आणि भयाचा संगम असलेल्या 'घबाडकुंड' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८.१० कोटी रुपयांची कमाई करत मोठे यश मिळवले आहे. मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील अनेक बहुचर्चित चित्रपटांच्या स्पर्धेतही 'घबाडकुंड'ने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत तिसऱ्या आठवड्यातही यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे.
'राजा शिवाजी', 'तुंबाडची मंजुळा', 'देऊळ बंद' या मराठी चित्रपटांसह हिंदीतील 'कॉकटेल', 'में वापस आऊंगा', 'वेलकम टू द जंगल' आणि हॉलिवूडमधील 'द ओडिसी', 'स्पायडर-मॅन' तसेच 'ऑब्सेशन' यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही 'घबाडकुंड'ला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकत असून, प्रेक्षकांकडून आगाऊ बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटातील दमदार लेखन, प्रभावी दिग्दर्शन, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, उत्कंठावर्धक संवाद, पार्श्वसंगीत आणि तांत्रिक मांडणी यामुळे 'घबाडकुंड'ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावरही चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून, सकारात्मक 'वर्ड ऑफ माऊथ'मुळे नव्या प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. कुटुंबासह, मित्रमंडळींसोबत आणि ग्रुप बुकिंगद्वारे चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे गर्दी करत आहेत.
'आयकॉन द स्टाईल'चे निर्माते डॉ. रसिक कदम निर्मित आणि प्रीतम एस. के. पाटील दिग्दर्शित 'घबाडकुंड' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, तिसऱ्या आठवड्यातही ही यशस्वी घोडदौड कायम राहील, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. दर्जेदार आशय आणि वेगळ्या मांडणीमुळे 'घबाडकुंड'ला मिळणारा प्रतिसाद हा मराठी चित्रपटांबद्दल प्रेक्षकांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारा ठरत आहे.
.jpeg)