जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
सिंधुदुर्गनगरी : आगामी जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंधुनीती सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध योजनांअंतर्गत उपलब्ध असलेला अखर्चित निधी तातडीने खर्च करून मंजूर विकासकामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५-२६ तसेच विविध योजनांअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंजूर योजनांच्या अंमलबजावणीची योजनानिहाय माहिती घेत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना निधी खर्चास गती देण्याचे निर्देश दिले.
अपूर्ण विकासकामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच ज्या कामांची निविदा प्रक्रिया प्रलंबित आहे, तीही त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. विकासकामांच्या अंमलबजावणीत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि प्रत्येक विभागाने कामांच्या दर्जाबाबत विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. विविध योजनांअंतर्गत आवश्यक असलेले दायित्व निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
बैठकीत अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला. या योजनांमधील अखर्चित निधी तातडीने खर्च करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत, तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रमासाठी दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
याशिवाय सिंधुरत्न समृद्ध योजना अंतर्गत दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, तसेच सिंधुरत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत प्रस्तावित कामांचे आराखडे निर्धारित मुदतीत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना दिल्या.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

