आसामच्या 'पुरबी' आईस्क्रीमची चव भूतानमध्ये चाखता येणार



नवी दिल्ली  : आसाममधील 'पुरबी' (Purabi) या ब्रँडच्या आईस्क्रीमची ५,६२७ लिटरची पहिली आंतरराष्ट्रीय खेप भूतानमध्ये निर्यात करण्यात आली आहे. या निर्यातीमुळे ईशान्य भारतातील मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची नवी दारे खुली झाली असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी दिली.


ही निर्यात नॉर्थ ईस्ट डेअरी अँड फूड्स लिमिटेड (NEDFL) यांच्या माध्यमातून करण्यात आली असून, भूतानची राजधानी थिंपू तसेच पारो, फुंटशोलिंग आणि वांगड्यू या प्रमुख शहरांमध्ये 'पुरबी' आईस्क्रीमची विक्री केली जाणार आहे. या उपक्रमामुळे आसामसह ईशान्य भारतातील दुग्धजन्य उत्पादनांना शेजारील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भक्कम स्थान मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


'पुरबी' आईस्क्रीमचे उत्पादन वेस्ट आसाम मिल्क प्रोड्युसर्स को-ऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड (WAMUL) मार्फत केले जाते. या उत्पादनासाठी 'पुरबी डेअरी'च्या विस्तृत सहकारी नेटवर्कमधील आसाममधील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून संकलित करण्यात आलेल्या दर्जेदार दुधाचा वापर केला जातो.


वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भूतानचे भौगोलिक जवळीक आसाममधून दुग्धजन्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी अत्यंत अनुकूल ठरत आहे. त्यामुळे 'मेड इन आसाम' उत्पादनांना शेजारील देशांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी भूतान महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार आहे.


दरम्यान, एनईडीएफएल पुढील काळात दीर्घकाळ टिकणाऱ्या (Long Shelf Life) 'पुरबी'च्या इतर दुग्धजन्य उत्पादनांचीही निर्यात सुरू करण्याच्या तयारीत आहे. तसेच, बाजारातील मागणीनुसार निर्यातीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढविण्याची योजना आखण्यात आली असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post