७० हजारांत बनावट पदवी आणि गुणपत्रिका विक्रीचा प्रकार उघड
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) बनावट पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तयार करून विद्यार्थ्याला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याकडून ₹७० हजार घेऊन बनावट बी.कॉम. पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तयार करून दिल्याचा आरोप असून, विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विद्यापीठाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, लेखा विभागात कार्यरत असलेले रमेश मुखेकर यांनी एका विद्यार्थ्याला अस्सल पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्याकडून ₹७० हजार स्वीकारल्याचा आरोप आहे.
त्यानंतर मुखेकर यांनी संबंधित विद्यार्थ्याला व्हॉट्सॲपद्वारे बी.कॉम. गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राची छायाचित्रे पाठवली. ही कागदपत्रे पाहता अधिकृत वाटत होती; मात्र तपासात ती पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले.
विद्यापीठाने स्पष्ट केले की, रमेश मुखेकर यांचा परीक्षा व मूल्यमापन विभागाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी तयार केलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अधिकृत नोंदींशी अजिबात जुळत नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत विद्यापीठाने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली.
या प्रकरणी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तळवारे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, या बनावट प्रमाणपत्र रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जाणार आहे.
विद्यापीठाच्या प्राथमिक चौकशीत, मुखेकर यांनी विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीविषयी असलेल्या माहितीचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे तयार केली असावीत, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणामागे इतर कर्मचारी किंवा कोणती संघटित टोळी कार्यरत होती का, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित विद्यार्थ्यावर कोणती कारवाई होणार, याबाबत विद्यापीठाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विद्यार्थ्याची भूमिका आणि त्याला बनावट कागदपत्रांची माहिती होती की नाही, याचाही तपास पोलीस करणार आहेत.
या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही दलालांवर किंवा अनधिकृत व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. अधिकृत गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये (Security Features) समाविष्ट करण्यात आली असून, त्यांची सत्यता सहज पडताळता येते, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.
