यंदा ११३ रक्तदात्यांचा सहभाग ; नगरसेविका दीपाली भगत व उमेश भगत यांचा उपक्रम
दिवा \ आरती परब : "रक्तदान हेच श्रेष्ठदान, रक्तदान हेच जीवनदान" या सामाजिक भावनेतून दिवा शहरात शिवसेना विभागप्रमुख उमेश अशोक भगत आणि नगरसेविका दीपाली उमेश भगत यांनी गेली २२ वर्षे अखंडपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची परंपरा कायम राखली आहे. यंदाही त्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड बँक यांच्या सहकार्याने आकांक्षा हॉल, बी.आर. नगर, दिवा येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण ११३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या रक्तदान शिबिराला नगरसेवक दीपक नामदेव जाधव, नगरसेवक आदेश कमलाकर भगत, नगरसेविका अर्चना निलेश पाटील, विभागप्रमुख गुरुनाथ पाटील, उपविभागप्रमुख सदा पाटील, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, दिवा- मुंब्रा सेवा केंद्राचे प्रतिनिधी, उपविभागप्रमुख सूर्यकांत कदम, शाखाप्रमुख सतीश निकम, अनिल मोरे, संतोष पेंढारी, कार्यालयप्रमुख सागर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. गेली दोन दशके सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे दिवा शहरात सामाजिक सेवेची एक प्रेरणादायी परंपरा निर्माण झाली असून, नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रक्तदान चळवळीला अधिक बळ मिळत असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
