डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीतील युवा क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते दर्शन सुनील अडारकर यांची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे डोंबिवलीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मोठी संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
RCB च्या वतीने दर्शन अडारकर यांना शाळा, क्रिकेट अकादमी, निवड चाचणीची मैदाने (ट्रायल ग्राऊंड्स) तसेच इतर निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी गुणवान खेळाडूंचा शोध घेणे (स्काऊटिंग), प्रशिक्षण शिबिरे (कोचिंग क्लिनिक्स) आयोजित करणे आणि खेळाडूंच्या निवडीशी संबंधित विविध उपक्रम राबविण्याचे अधिकृत अधिकार देण्यात आले आहेत.
खेळाडूंच्या निवडीशी संबंधित सर्व बाबींसाठी दर्शन अडारकर हे अधिकृत संपर्क व्यक्ती (पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट) म्हणून कार्यरत राहणार आहेत. RCB च्या पूर्ण पाठिंब्यासह खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संस्था तसेच मैदान व्यवस्थापन प्राधिकरणांशी संवाद साधण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत.
दर्शन अडारकर यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी, संस्था आणि व्यवस्थापनांनी आवश्यक ते पूर्ण सहकार्य व पाठिंबा द्यावा, असे आवाहनही अधिकृत पत्राद्वारे करण्यात आले आहे.
ही नियुक्ती १० जुलै २०२६ पासून लागू झाली असून, पुढील सूचना मिळेपर्यंत ती वैध राहणार आहे. RCB च्या भविष्यातील स्टार खेळाडूंचा शोध घेणे आणि त्यांना घडविण्याच्या मोहिमेसाठी दर्शन अडारकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे टीम डायरेक्टर राजेश मेनन यांनी दर्शन अडारकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
