आयुषसमोर शि यू कीचे आव्हान

 



जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची सोडत जाहीर; सिंधू-लक्ष्यची सुरुवात तुलनेने सोपी

नवी दिल्ली : बीडब्ल्यूएफ (BWF) जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची बुधवारी सोडत जाहीर झाली. भारतीय खेळाडूंना संमिश्र सोडत मिळाली असून आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आयुष शेट्टी याची पहिल्याच फेरीत विद्यमान विश्वविजेता चीनचा शि यू की याच्याशी लढत होणार आहे. तर पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांना तुलनेने सोपी सुरुवात मिळाली आहे.


भारत तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून, १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये स्पर्धा रंगणार आहे.


माजी विश्वविजेती पी. व्ही. सिंधू सहाव्या जागतिक पदकाच्या शोधाला आयर्लंडच्या जागतिक क्रमवारीत १४१व्या स्थानावरील सोफिया नोबेलविरुद्ध सुरुवात करेल. तर २०२१ मधील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनचा पहिला सामना ऑस्ट्रियाच्या कोलिन्स व्हॅलेंटाईन फिलिमॉन याच्याविरुद्ध होईल. लक्ष्यने पुढे मजल मारल्यास उपउपांत्यपूर्व फेरीत त्याला दुसऱ्या मानांकित थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्न याचे आव्हान असू शकते.


गत महिन्यात जपान ओपन जिंकलेल्या सिंधूला पदक फेरीपूर्वी जागतिक क्रमवारीतील अव्वल अन से यंग (दक्षिण कोरिया) आणि विद्यमान विश्वविजेती अकाने यामागुची (जपान) यांच्याशी सामना टाळण्यात यश आले आहे. मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या तिसऱ्या मानांकित वांग झी यी, तर उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित पुत्री वर्दानी हिच्याशी सामना होण्याची शक्यता आहे.


पुरुष दुहेरीत पाचवे मानांकन मिळालेल्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. दुसऱ्या फेरीत त्यांची लढत स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन-ॲडम प्रिंगल किंवा थायलंडच्या चालोएमपोन चारोएनकिटामॉर्न-वोरापोल थोंगसा-न्गा या जोड्यांपैकी एका जोडीशी होईल. त्यांच्यासाठी पहिली मोठी कसोटी इंडोनेशियाच्या १२व्या मानांकित रेमंड इंद्रा-निकोलॉस जोआक्विन जोडीविरुद्ध असू शकते.


राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी भारतीय खेळाडूंसाठी ही सोडत एकूण अनुकूल असल्याचे मत व्यक्त केले. आयुषसमोर पहिल्याच फेरीत शि यू कीचे मोठे आव्हान असले तरी त्याच्या आक्रमक खेळामुळे तो धक्का देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लक्ष्य सेनबाबत बोलताना गोपीचंद म्हणाले की, २०२१ मध्ये जागतिक स्पर्धेचे पहिले पदक जिंकणाऱ्या लक्ष्यचा अनुभव आता अधिक समृद्ध झाला असून मोठ्या स्पर्धा जिंकण्याची त्याची क्षमता वाढली आहे. योग्य दिवशी तो जगातील कोणत्याही खेळाडूला पराभूत करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


पुरुष एकेरीतील स्पर्धा यंदा अत्यंत खुली असल्याचे सांगत गोपीचंद यांनी लक्ष्य आणि आयुष या दोघांनाही पदक जिंकण्याची वास्तववादी संधी असल्याचे नमूद केले.


महिला एकेरीत उन्नती हुडा हिचा पहिल्या फेरीत म्यानमारच्या थेट हतार थुझार हिच्याशी सामना होईल. पुढील फेरीत तिच्यासमोर कॅनडाच्या १३व्या मानांकित मिशेल लीचे आव्हान असू शकते.


मिश्र दुहेरीत १५व्या मानांकित ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. तर रोहन कपूर आणि जी. रुथविका शिवानी यांची पहिल्या फेरीत कॅनडाच्या जोनाथन लाय-क्रिस्टल लाय जोडीशी गाठ पडेल.


महिला दुहेरीत राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची स्पेनच्या पॉला लोपेझ-लुसिया रोड्रिगेझ जोडीशी लढत होईल. तसेच सिमरन सिंघी आणि कविप्रिया सेल्वम यांचा सामना स्पेनच्या निकोल कारुला-कार्मेन जिमेनेझ जोडीशी होईल.


पुरुष दुहेरीतील दुसरी भारतीय जोडी एम. आर. अर्जुन आणि हरीहरन यांची पहिल्या फेरीत आयर्लंडच्या स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांच्याशी लढत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post