रत्नागिरीत मनसेला नवी संजीवनी; राज ठाकरेंचा मोठा डाव
शेखर धोंगडे \ रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकारणाला सोमवारी नवी दिशा मिळाली. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे काही काळ दुरावलेले आक्रमक नेते जितेंद्र चव्हाण यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या निर्णयामुळे मध्य रत्नागिरीतील मनसेच्या संघटनेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
कडवई येथील रहिवासी असलेले जितेंद्र चव्हाण हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात. पदापुरते राजकारण न करता जनतेच्या प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
यादववाडी ब्रिजची उभारणी, कडवई रेल्वे स्थानकावरील सुविधा तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलने केली. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेतल्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव निर्माण झाला आहे.
दोन वर्षांनंतर पुन्हा पक्षाची धुरा
स्थानिक पातळीवरील अंतर्गत राजकारणामुळे सुमारे दोन वर्षांपूर्वी चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पक्षाच्या सक्रिय पदापासून दूर राहिले. मात्र, पद नसतानाही त्यांनी सामाजिक कार्य सुरूच ठेवले. या काळात विविध राजकीय पक्षांकडून त्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर्स आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करता मनसेशी असलेली आपली निष्ठा कायम ठेवली.
चव्हाण यांच्या अनुपस्थितीत मध्य रत्नागिरीतील मनसे संघटनेवर परिणाम झाल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन पुन्हा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी थेट हस्तक्षेप करत चव्हाण यांच्यावर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याचे मानले जात आहे.
जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे आव्हान
चव्हाण यांच्या पुनरागमनामुळे गेल्या काही काळात निष्क्रिय झालेले किंवा पक्षापासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा मनसेच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची शक्यता आहे. मध्य रत्नागिरीतील प्रत्येक तालुका आणि गावात संघटन मजबूत करणे, शाखा सक्रिय करणे आणि नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचे पुनरागमन मनसेसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षातील काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण केले, त्यामुळे मी बाजूला झालो होतो. मात्र, माझी पक्षावरील निष्ठा आणि राजसाहेबांवरील विश्वास कायम होता. राजीनाम्यानंतर अनेक ऑफर्स आल्या; पण मी पक्षाशी गद्दारी केली नाही. आता राजसाहेबांनी माझ्यावर मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी समर्थपणे स्वीकारून भविष्यात जिल्ह्यात पक्षाची ताकद दुप्पट करण्यासाठी आणि राजसाहेबांना बळ देण्यासाठी कटिबद्ध राहीन.
— जितेंद्र चव्हाण, मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, मनसे
