वीज व गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सविस्तर चर्चा
ढाका : वीज आणि गॅसच्या सुरू असलेल्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी बांगलादेशने भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केली आहे. भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी गुरुवारी बांगलादेशचे वीज, ऊर्जा आणि खनिज संसाधन मंत्री इक्बाल हसन महमूद यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली.
भारतीय उच्चायुक्तालयाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये भारत-बांगलादेश ऊर्जा आणि वीज क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सविस्तर चर्चा झाली. सीमापार वीज आणि ऊर्जा जोडणी (Cross-border Energy Connectivity) ही दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे दोन्ही बाजूंनी अधोरेखित करण्यात आले.
परस्पर हित आणि परस्पर लाभ या तत्त्वावर आधारित सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, ऊर्जा सुरक्षा वाढविणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि दोन्ही देशांतील नागरिकांच्या समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी पुन्हा व्यक्त केला.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री इक्बाल हसन महमूद यांनी सांगितले की, डिझेलच्या तुटवड्याचा थेट परिणाम गॅसवर चालणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पांवर होत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग करावे लागत आहे. ते म्हणाले, "भारताशी जोडलेल्या पाइपलाइनद्वारे आम्हाला डिझेलचा पुरवठा केला जातो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आम्ही भारताकडे या पाइपलाइनमधून अधिक डिझेल पुरवण्याची विनंती केली आहे."
भारत हा शेजारी देश असल्याने दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताचे अनेक विषय असून, त्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनद्वारे सुमारे ३० हजार टन डिझेलचा पुरवठा बांगलादेशला करण्यात आला होता.
मात्र, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात या पाइपलाइनद्वारे होणारा डिझेल पुरवठा काही काळासाठी थांबविण्यात आला होता.
