जोगीला तलावात दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू


ठाणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हृदयद्रावक घटना घडली. जोगीला तलावात दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ वर्षीय आणि ४ वर्षीय अशा दोन चिमुकल्या बहिणी आपल्या ५ वर्षांच्या लहान भावाला नेहमीप्रमाणे शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. भावाला शाळेत सोडल्यानंतर दोन्ही मुली घरी परतण्यासाठी निघाल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

शोध घेत असताना राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगीला तलावात दोन्ही मुलींचे मृतदेह तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही सुरू केली.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन्ही मुली आपल्या ५ वर्षांच्या भावाला शाळेत सोडल्यानंतर घरी परतताना जोगीला तलावाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले आहे. प्राथमिक पोलीस तपासात मुलींसोबत कोणतेही गैरकृत्य झाल्याचे आढळून आलेले नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी करण्यात येत आहे.

दररोज भावाला शाळेत सोडल्यानंतर थेट घरी परतणाऱ्या या दोन्ही चिमुकल्या त्या दिवशी अचानक जोगीला तलावाच्या दिशेने का गेल्या? त्या तलावात नेमक्या कशा पडल्या? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. दोन्ही मुलींच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी ठाणे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post