पुण्यात ३३ तास २७ मिनिटांनी गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता


४,१७० गणेश मंडळांचा सहभाग; ६.२४ लाख घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन 

पुणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरू झालेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल ३३ तास २७ मिनिटांनंतर शनिवारी सायंकाळी संपली. पारंपरिक उत्साह, मोठी गर्दी आणि ढोल-ताशांसह सुरू असलेल्या या मिरवणुकीची सांगता महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली.

शुक्रवारी सकाळी पाच मानाच्या गणपती मंडळांनी अलका टॉकीज चौकाच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी १०.३० वाजता सुरू झाली आणि दुपारी ४.४३ वाजता मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक शुक्रवारी दुपारी ४.१८ वाजता सुरू झाली आणि रात्री ८.२७ वाजता विसर्जनाची सांगता झाली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजता महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर संपूर्ण मिरवणुकीची सांगता झाली.

पोलिसांच्या माहितीनुसार, यंदाच्या मिरवणुकीत ४,१७० गणेश मंडळांनी सहभाग घेतला, तर शहरातील विविध विसर्जन घाटांवर ६ लाख २४ हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिक, स्वयंसेवक आणि सर्व संबंधित घटकांचे आभार मानले. प्रचंड गर्दी असतानाही गणेशोत्सव शांततेत आणि कोणतीही अनुचित घटना न घडता पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

मिरवणुकीला ३३ तासांहून अधिक वेळ लागला असला तरी हा कालावधी पोलिसांसाठी महत्त्वाचा नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मोठ्या गर्दीतही उत्सव सुरक्षितपणे पार पडणे आणि नागरिकांना कमीतकमी त्रास होणे हेच पोलिसांचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.


ध्वनिनियमांचे यंदा अधिक चांगले पालन

२०२५च्या तुलनेत यंदा निर्धारित ध्वनिमर्यादांचे अधिक चांगले पालन झाल्याचेही आयुक्त कुमार यांनी सांगितले. डीजेच्या आवाजाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, २४ सप्टेंबरपर्यंत २१ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


मेट्रोचा सहा लाख नागरिकांना फायदा

गणेशोत्सवादरम्यान पुणे मेट्रो सेवा नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत सुमारे सहा लाख नागरिकांनी मेट्रो सेवेचा वापर केल्याची माहिती आयुक्त कुमार यांनी दिली. गर्दीचे व्यवस्थापन, महिला सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी नियोजन व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रचंड गर्दी असूनही विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरून ३४ रुग्णवाहिका यशस्वीपणे मार्गस्थ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.







Post a Comment

Previous Post Next Post