वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : ‘वेलकम’, ‘गदर’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसह ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कर्करोगाशी झुंज देत असताना मुंबईतील नानावटी रुग्णालयात सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुश्ताक खान यांना पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावली होती, अशी माहिती त्यांचा मुलगा मोहसीन यांनी दिली.
पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. सहाय्यक तसेच व्यक्तिरेखा भूमिकांमधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. ‘आशिकी’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘साथी’, ‘सडक’, ‘जुनून’, ‘गुनाह’, ‘सर’, ‘गदर’, ‘वेलकम’ आणि ‘गदर २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराच्या मुलाच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्येही सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
.jpeg)