दिव्यात श्री संत सेनाजी महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न

 


दिवा  \ आरती परब :  सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संलग्न - नाभिक समाज संघटना (दिवा) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत सेनाजी महाराज पुण्यतिथी सोहळा मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. दिवा पूर्व येथील स्टेशन रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील वीरा फाउंडेशन कार्यालयासमोर आयोजित या कार्यक्रमाला नाभिक समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी श्री संत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. समाजातील बांधवांनी एकत्र येत संत सेनाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण केले. समाजाची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला दिवा व्यापारी वेल्फेअर असोसिएशनेचे अध्यक्ष उमेश भगत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी नाभिक समाजाने व्यवसायासोबतच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष अरुण शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सेक्रेटरी राजेंद्र महाडिक, खजिनदार गोपाल शर्मा यांच्यासह सदस्या सिद्धेश पवार, विजय राजेकर, शांताराम बदिरके, अमोल शिंदे, वैजनाथ ठाकूर, राजू शर्मा, पंकज शर्मा तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमामुळे दिव्यातील नाभिक समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

Previous Post Next Post