दिवा प्रभाग २९ मध्ये आरोग्य केंद्र कार्यान्वित


बाबाजी पाटील, अर्चना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; दीड लाख लोकवस्तीला आरोग्याचा आधार

दिवा \ आरती परब : दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मधील खान कंपाउंड, दोस्ती आणि शिबली नगर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. तब्बल एक ते दीड लाख लोकवस्ती असलेल्या या परिसरासाठी प्रभागातील पाचव्या आरोग्य केंद्राचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला. नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका अर्चना पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे.

खान कंपाउंड, दोस्ती आणि शिबली नगर परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवेसाठी सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण फाटा येथील आरोग्य केंद्रात जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी एवढे अंतर जाणे त्रासदायक ठरत होते. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन परिसरातच आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी बाबाजी पाटील आणि अर्चना पाटील यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश मिळाले असून सुसज्ज लोखंडी केबिन स्वरूपात प्रभाग २९ मधील पाचवे आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या लोकवस्तीला आता घराजवळच प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांना साध्या आजारांसाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नसून वेळ आणि आर्थिक खर्चाचीही बचत होणार आहे.

या आरोग्य केंद्रामध्ये रक्तदाब व मधुमेह तपासणी, मोफत औषधे, डॉक्टरांचा सल्ला, लहान मुलांचे लसीकरण, गरोदर मातांची तपासणी तसेच प्राथमिक उपचार यांसारख्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने प्राथमिक उपचार मिळण्यासही मदत होणार आहे.

एक ते दीड लाख लोकसंख्येच्या परिसरात आरोग्य केंद्राची असलेली गरज लक्षात घेता हे केंद्र नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः कल्याण फाटा येथील आरोग्य केंद्रापर्यंत जाण्याची होणारी गैरसोय आता दूर होणार असल्याने खान कंपाउंड, दोस्ती आणि शिबली नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आरोग्य केंद्राच्या शुभारंभप्रसंगी नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील, वेदिका पाटील, विभाग प्रमुख गणेश मुंडे, विभाग संघटक वैभव आलिमकर, अन्वर कच्ची, आरिफ शेख, दोस्ती फाउंडेशनचे चेअरमन आरिफ शेख, आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. नवीन आरोग्य केंद्रामुळे प्रभाग २९ मधील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि जवळच्या अंतरावर मिळणार असून, मोठ्या लोकवस्तीच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यास या केंद्राची मदत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post