बाल लैंगिक शोषणाचे साहित्य आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा

 


 रायगड पोलिसांचे सायबर पॅट्रोलिंगद्वारे कारवाईवर लक्ष

रायगड | धनंजय कवठेकर
MAHARASHTRA WEBNEWS

बाल लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील फोटो, व्हिडिओ किंवा अन्य डिजिटल साहित्य (Child Sexual Abuse Material – CSAM) तयार करणे, साठवणे, शेअर करणे अथवा प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. इंटरनेट किंवा सोशल मीडियावर असे साहित्य आढळल्यास ते पुढे न पाठवता तात्काळ पोलिसांना किंवा संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे.

बालकांचे लैंगिक शोषण किंवा अत्याचार चित्रित करून तयार केलेले फोटो, व्हिडिओ किंवा अन्य डिजिटल सामग्री कायद्याच्या कक्षेत येते. माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६७B तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) मधील संबंधित तरतुदींनुसार अशा प्रकरणांत कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.

अशा प्रकारचे साहित्य जाणूनबुजून पाहणे, साठवणे, डाउनलोड करणे, शेअर करणे, प्रसारित करणे किंवा तयार करणे यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे उत्सुकतेपोटीही असे साहित्य पुढे पाठवू नये तसेच मोबाईल, संगणक किंवा अन्य डिजिटल उपकरणांमध्ये सेव्ह करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

रायगड पोलिसांचे सायबर पॅट्रोलिंग

रायगड पोलिसांच्या सायबर सेलमार्फत तसेच संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या समन्वयाने इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर पॅट्रोलिंग करण्यात येत आहे. बाल लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य प्रसारित करणाऱ्या किंवा त्याच्याशी संबंधित बेकायदेशीर कृती करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले.

संशयास्पद साहित्य आढळल्यास काय करावे?

सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ आढळल्यास ते डाउनलोड, सेव्ह किंवा पुढे शेअर करू नये. त्याऐवजी तात्काळ संबंधित सायबर गुन्हे यंत्रणेला माहिती द्यावी. सायबर गुन्ह्यांबाबत १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देता येते.

“अशा प्रकारचे साहित्य आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्या. बालकांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही सायबर गुन्ह्यांविरोधातील या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post