दिवा रेल्वे स्थानकातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

 


दिव्यांगांसाठी राखीव जागांचा गैरवापर; स्वयंचलित जिने, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी

दिवा | आरती परब
MAHARASHTRA WEBNEWS

दिवा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवराज्य ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवा स्थानकावर जाऊन उपस्थानक मास्तर एस. के. सिंग यांची भेट घेत प्रवाशांच्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी रेल्वे प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.

स्थानकावरील दिव्यांग, गर्भवती महिला आणि कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी राखीव असलेल्या आसनांवर सामान्य प्रवासी बसत असल्याची तक्रार संघटनेने केली आहे. राखीव जागांचा गैरवापर करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि संबंधित जागांचा उद्देश प्रभावीपणे जपला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वयंचलित जिने वारंवार बंद

दिवा स्थानकावरील स्वयंचलित जिने वारंवार बंद राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे जिने नियमितपणे कार्यरत ठेवून त्यांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

स्थानकावर स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि परिसरातील नियमित स्वच्छतेच्या सुविधांकडेही रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे संघटनेने म्हटले आहे. प्रवाशांच्या दैनंदिन वापरातील या मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

शिवराज्य ब्रिगेडचे कोकण विभागीय अध्यक्ष सुजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. ठाणे महानगर उपाध्यक्ष विलास उतेकर यांच्या प्रयत्नांना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भानसे, ठाणे जिल्हा संघटक शशिकांत कुंभारगण आणि ठाणे महानगर संघटक अनिल पवार यांचे सहकार्य लाभले.

दिवा रेल्वे स्थानकातून मोठ्या संख्येने नागरिक दररोज प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि सोयीशी संबंधित प्रश्नांकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

प्रवाशांच्या हक्कांसाठी आणि आवश्यक सुविधांसाठी शिवराज्य ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post