कोल्हापूर | शेखर धोंगडे
MAHARASHTRA WEBNEWS
एसटी बसमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व दक्षता शाखेने केलेल्या तपासणीत एका प्रवाशाकडून गोवा बनावटीच्या दारूच्या तब्बल १०० बाटल्या आढळून आल्या.
पणजी-महाबळेश्वर मार्गावर धावणाऱ्या MH 14 MH 8402 क्रमांकाच्या एसटी बसची कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात तपासणी करण्यात आली. यावेळी पणजी ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या सावळा बिरा पांढरे (रा. पांढरेवाडी, ता. जत, जि. सांगली) यांच्या ताब्यातील पोत्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान पोत्यात RUM XXX प्रकारच्या १८० मिली क्षमतेच्या १०० बाटल्या आढळून आल्या. चालक आणि वाहकाला प्रवाशाच्या संशयास्पद हालचाली जाणवल्यानंतर सुरक्षा यंत्रणेला माहिती देण्यात आली. त्यानंतर अधिक दक्षतेने तपासणी केल्याने दारूचा साठा उघडकीस आला.
त्यानंतर संबंधित प्रवासी आणि दारूचा साठा पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई एसटीच्या सुरक्षा व दक्षता शाखेचे अधिकारी व पर्यवेक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल बंडगर यांच्या सहकार्याने करण्यात आली.
प्रवाशांची सुरक्षितता कायम ठेवण्यासोबतच एसटीच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी बसस्थानकांवर आणि बसमध्ये अशा प्रकारच्या तपासण्या यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
