अशोक पाठक ‘राणी ड्रायक्लीनर्स’मधून हिरोच्या भूमिकेत
मुंबई : लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’मधील बिनोदच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अशोक पाठक आता हिंदी चित्रपटसृष्टीत प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. ‘राणी ड्रायक्लीनर्स’ या चित्रपटातून तो मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी गुरुवारी केली.
अशोक पाठकने यापूर्वी अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘पंचायत’मधील बिनोदच्या व्यक्तिरेखेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्याच्या भूमिकेतील ‘देख रहा है, बिनोद’ हा संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आणि त्याचे मीम्सही व्हायरल झाले.
‘राणी ड्रायक्लीनर्स’ची निर्मिती मानसी गुप्ते, अनिश कुमार आणि दुश्यंत सॅन्ड यांनी केली असून सागर कुमार शर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मानसी गुप्ते यांनी यापूर्वी सई ताम्हणकर निर्मित मराठी चित्रपट ‘कलरफूल’शी संबंधित काम केले आहे.
चित्रपटात ‘अफरान’ आणि ‘डार्क ७ व्हाइट’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री मोनिका चौधरीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील गाणी रेखा भारद्वाज, जावेद अली, नकश अझीझ आणि कैलाश खेर या प्रसिद्ध गायकांनी गायली आहेत.
‘राणी ड्रायक्लीनर्स’चे संपूर्ण चित्रीकरण उत्तराखंडमध्ये एकाच शेड्यूलमध्ये करण्यात आले असून सध्या चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. चित्रपटाची कथा आणि प्रदर्शनाची तारीख याबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
